कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरलेल्या असताना, कोकणातील एक्स्प्रेस गाडी बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून, त्याच्या वेळेत आता कायमस्वरूपी दादर-गोरखपूर रेल्वेगाडी चालवली जाणार आहे. दादरवरून थेट रत्नागिरीला जाणारी ही रद्द केलेली रेल्वेगाडी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी प्रवासी एकत्र येत आहेत.
१९९६-९७ पासून रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर सुरू झालेली एक पॅसेंजर गाडी नंतर रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवण्यात आली. मार्च २०२० पर्यंत ती प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी अत्यंत सोयीस्कर होती. ही गाडी सर्व स्थानकांवर थांबत असल्यामुळे ती लोकप्रिय होती. मात्र, करोना काळात सप्टेंबर २०२१ पासून मध्य रेल्वेने वेळापत्रक व मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देत ती बंद केली. त्यानंतर दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली; परंतु तिच्या वेळापत्रकात सातत्य नव्हते. आता नवीन वेळापत्रकात दादर-गोरखपूर गाडी त्या वेळेत चालवली जाणार आहे.
मध्य रेल्वेने दिवा-दादर मार्गावर क्षमता नसल्याचे सांगत दादर-गोरखपूर (चार दिवस) व दादर-बालिया (तीन दिवस) या विशेष गाड्या सुरू केल्या. १ जानेवारी २०२५ पासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या गाड्या कायमस्वरूपी करण्यात आल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी सांगितले.
दादर-रत्नागिरीच्या वेळेपेक्षा या गाड्यांच्या वेळा वेगळ्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचा व सध्या चालणाऱ्या दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असे प्रवीण पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी स्पष्ट केले.

दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले; कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
•
Please follow and like us:
Leave a Reply