यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा गावातून एक अत्यंत भावनिक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने युपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आयएएस पदावर निवड झाल्याचा आनंद साजरा करत असताना वडिलांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहीनी खंदारे हिने अलीकडेच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत यश संपादन करत भारतीय प्रशासन सेवेची (IAS) पदवी मिळवली. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे खंदारे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते. गावकरी, नातेवाईक आणि हितचिंतक या गौरवाच्या क्षणासाठी एकत्र जमले होते.
मोहीनीच्या या यशामागे प्रल्हाद खंदारे यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांची मेहनत, सततचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा यामुळेच मोहिनीला हे यश प्राप्त होऊ शकले. या यशात केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण गाव सहभागी झाला होता, कारण या घडामोडीमुळे गावाचे नाव थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
मात्र, या आनंदमय वातावरणातच दुर्दैवाने दुःखद वळण आले. यशाचा उत्सव साजरा करत असताना प्रल्हाद खंदारे अचानक जमिनीवर कोसळले. तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या अत्यंत दु:खद घटनेने खंदारे कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण वागद ईजारा गाव शोकमग्न झाला आहे. ज्या क्षणी अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात होता, त्याच क्षणी आयुष्याने मोठा आघात दिला, ही शोकांतिका सर्वांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे.


Leave a Reply