दिल्ली : राजधानीच्या राजकारणाला हादरा देणारी घटना बुधवारी घडली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जनता दरबारात हल्ला केला. आरोपीने प्रथम दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेम चुकल्याने मुख्यमंत्र्यांना इजा झाली नाही. त्यानंतर त्याने थेट गुप्ता यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राजेश साक्रिया असून तो गुजरातच्या राजकोटचा रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की तो भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलिकडील आदेशामुळे नाराज होता. राजेशला कुत्र्यांबद्दल विशेष जिव्हाळा असल्याने तो या निर्णयामुळे अस्वस्थ झाला आणि नंतर त्याने आज हे अशाप्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “दिवसाचे १८ तास काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री आठवड्याला सार्वजनिक सुनावणी घेतात. अशा वेळी हल्ल्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.” राजेशच्या आई भानू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझ्या मुलाला कुत्रे खूप आवडतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तो नाराज होता आणि दिल्लीला निघून गेला. त्याने हल्ला का केला याची आम्हालाही कल्पना नाही.” या प्रकरणामुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली असून, हल्ल्याच्या घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे. पोलीस आरोपीचा हेतू आणि पार्श्वभूमी शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
Leave a Reply