चारधाम यात्रा ही हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ३० एप्रिलपासून ही यात्रा सुरू होणार आहे. यावेळी गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे उघडले जातील. २ मे रोजी केदारनाथ धामाचे तर ४ मे रोजी बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडले जाणार आहेत. मात्र, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनीही यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजप आमदार आशा नौटियाल यांचे वादग्रस्त वक्तव्य
उत्तराखंडच्या भाजप नेत्या आणि केदारनाथच्या आमदार आशा नौटियाल यांनी केदारनाथ यात्रेच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांना विचारले की, केदारनाथमध्ये मांसाहार, मासे किंवा मद्य दिले जात आहे का? यावर नौटियाल म्हणाल्या, ही बाब सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल. तसेच, त्यांनी केदारनाथ धामच्या पावित्र्याला हानी पोहोचवण्याचा काही गैर-हिंदू घटक प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नौटियाल म्हणाल्या, जर काही लोक असे काही करत असतील, ज्यामुळे केदारनाथ धामची प्रतिमा मलिन होत असेल, तर अशा लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली पाहिजे. हे लोक निश्चितपणे बाहेरून आलेले गैर-हिंदू आहेत, जे धामाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहेत. यासंदर्भात मंत्री सौरभ बहुगुणा यांनी देखील स्थानिक प्रशासन व लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. त्यांनी सूचित केले की, अशा व्यक्तींची ओळख पटवून, त्यांच्या मंदिर परिसरातील प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्ला
या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय आहे. उत्तराखंड ही ‘देवभूमी’ आहे आणि कुठंपर्यंत तुम्ही सर्व काही धर्माशी जोडाल? ते हे सर्व करत आहेत कारण त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीही नाही. असा घणाघात माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी केला आहे.
Leave a Reply