उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धवसेनेवर टीका: “निवडणुकीपुरतं मराठी, नंतर कोण रे तू?”

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “निवडणुकीच्या आधी मराठी मराठी करायचे आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसाला विचारायचे ‘कोण रे तू?’ असा सवाल करत शिंदे यांनी उद्धवसेनेचा स्वार्थी अजेंडा उघड केला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

धारावी पुनर्विकास आणि रस्ते कामांवरून टीका

शिंदे यांनी उद्धवसेनेवर आरोप केला की, त्यांना केवळ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा आहे. धारावीतील लोकांना सध्या भयंकर परिस्थितीत रहावे लागत आहे. त्यांच्यासाठी सरकार पुनर्विकास प्रकल्प आणत असताना, उद्धवसेना त्याला विरोध करत आहे. याव्यतिरिक्त, सरकार टिकाऊ काँक्रिटचे रस्ते बनवत असताना, उद्धवसेना त्यात भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. शिंदे यांनी आव्हान दिले की, आरोप जरूर करा, पण रस्त्यांच्या कामांचे लेखापरीक्षण (ऑडिट) देखील करा.

कोविड काळातील घोटाळे आणि मिठी नदीवरील सवाल

शिंदे यांनी कोविड काळातील कथित घोटाळ्यांवरूनही उद्धवसेनेला घेरले. “कोविड काळात खिचडी घोटाळा कोणी केला? डेडबॉडी बॅग चोर कोण? दरवर्षी रस्ते दुरुस्तीचे टेंडर देणारे कोण? टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा टेंडर कोण ते आधी बघा?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. मिठी नदीतील गाळ काढण्यावरून ‘दिनो मोरिया’चा उल्लेख करत, शिंदे यांनी थेट हल्ला चढवला. “मिठीतला गाळ काढण्यासाठी दिनो मोरिया दिसला, पण मराठी माणूस दिसला नाही. जर त्या दिनोने तोंड उघडले तर कोणाचा मोरया होईल ते बघा,” असा चौफेर हल्ला शिंदे यांनी चढवला.

धारावी प्रकल्पातील सरकारची भूमिका

विधानसभेत नियम १९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी धारावी प्रकल्पावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आधीच्या सरकारने केवळ पात्र लोकांना धारावीत घरे देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या सरकारने पात्र-अपात्र सगळ्यांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून रेल्वेची जागा मिळाली असून तिथे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. शिंदे यांनी स्पष्ट केले की, सरकार जमीन विकासकाला देत नसून, डीआरपी (धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) ला देत आहे, जेणेकरून त्या लोकांचे जीवनमान सुधारले जाईल.

अटल सेतू आणि सागरी किनारा मार्ग प्रकल्पांचा उल्लेख

शिंदे यांनी सांगितले की, त्यांचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी अनेक प्रकल्प ठप्प होते. त्यांच्या सरकारने सागरी किनारा मार्ग आणि अटल सेतू हे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामांच्या ऑडिटचे आव्हान दिले. आपल्या भाषणाचा समारोप करताना शिंदे यांनी गालिबचा प्रसिद्ध शेर ऐकवला: “उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा.” हा शेर ऐकवत शिंदे यांनी उद्धवसेनेला टोला लगावला, “इथे तुमच्या डोळ्यातच धूळ आहे, ती साफ करा.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *