विकसित भारत 2047 मिशन यशस्वी करण्यासाठी आणि 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या वाटचालीत शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा मोलाचा वाटा आहे. याच अनुषंगाने, महाराष्ट्र हे देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे राज्य ठरणार असल्याची घोषणा माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी निर्णय ऐतिहासिक ठरेल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणारे हे विद्यापीठ आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने प्रेरित उद्योगांसाठी नवा अध्याय उघडेल. तरुणांना आणि विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज करणारे हे विद्यापीठ भविष्यातील तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र बनणार आहे. संशोधन आणि कौशल्य विकासाचा मिलाफ घडवणारे हे विद्यापीठ भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सक्षम करेल, असेही त्यांनी नमूद केले.
सरकार लवकरच देशातील पहिले राज्यस्तरीय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर धोरण जाहीर करणार आहे. यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, या धोरणाचा आराखडा माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होईल. महाराष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहणार असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्रात परिवर्तन घडवण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री शेलार यांनी ठामपणे सांगितले.

देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात
•
Please follow and like us:
Leave a Reply