महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवणारी घटना मंगळवारी मुंबईत घडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका विवाहसोहळ्यात अनपेक्षित भेट झाली. राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाला दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटे हलक्याफुलक्या वातावरणात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या संवादावेळी भाजपा नेते आशिष शेलारही दोघांच्या सोबत बसले होते.
काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली होती. डॉक्टरांनी त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी, असा सल्ला दिल्यानंतर राऊत काही दिवस सार्वजनिक आयुष्यातून दूर राहिले होते. मात्र, आता त्यांची तब्येत सुधारत असून ते हळूहळू सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत.
उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच भांडूप येथील मैत्री बंगल्यावर भेट देऊन राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. राऊत लवकरच पूर्णपणे राजकारणात सक्रिय होतील, असे तेव्हा ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही राऊत यांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नातील फडणवीस–राऊत यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. उद्धव ठाकरे देखील या सोहळ्यात उपस्थित होते; मात्र त्यांची आणि फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट झाली की नाही, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तरीही, सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि राऊत यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


Leave a Reply