मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गुन्हेगारीच्या मुद्द्यावर गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार पहाटेच परळीत दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे रवाना झाले.
बैठकीत धनंजय मुंडे हजर राहणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क होते. मात्र, अखेर त्यांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या उजव्या बाजूला मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बसले होते. याच बैठकीत खासदार रजनी पाटील, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांचीही उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या कामांचा आढावा घेतला आणि जिल्ह्यातील अनियमित कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नियोजन आराखड्याबाहेरील प्रकल्प मंजूर कसे झाले, याचा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. “यापुढे विकासकामात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी जाणार आहेत. सध्या वेगवेगळ्या आरोपांनी घेरलेले मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच “मी अभिमन्यू नव्हे, अर्जुन आहे” असे विधान करत राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. अशा पार्श्वभूमीवर, आत्ममंथनासाठी ते आपल्या उर्जास्थानावर मुक्काम करणार असल्याचे बोलले जात आहे. उद्या सकाळी ते भगवानगडावरून परळीत परतणार असून पुढचे दोन दिवस परळीतच राहणार आहेत.
बैठकीदरम्यान अजित पवार यांनी सोशल मीडियावरून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यांनी ट्विट करून स्पष्ट केले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेण्यात आला. नागरी समस्या आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. “प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाव्यात,” असा स्पष्ट सल्ला अजित पवारांनी दिला.

धनंजय मुंडे अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह बीड जिल्हा नियोजन बैठकीला उपस्थित
•
Please follow and like us:
Leave a Reply