धाराशिव : ऑनलाइन रम्मीच्या व्यसनामुळे आलेल्या कर्जबाजारीपणातून एका २९ वर्षीय तरुणाने आपली पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. लक्ष्मण मारुती जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी तेजस्विनी (२१) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा एक मुलगा होता.
ऑनलाइन रम्मीमुळे झाला होता कर्जबाजारी
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण जाधव ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या व्यसनात मोठ्या प्रमाणावर गुंतला होता. या व्यसनामुळे तो कर्जबाजारी झाला होता. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या मालकीची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती, तरीही तो कर्जमुक्त होऊ शकला नव्हता. यामुळे तो प्रचंड तणावात होता.
रविवारी रात्री जाधवने आपली पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष पाजून ठार केले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे गंभीर परिणाम
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने गावकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेमागे ऑनलाइन रम्मीमुळे आलेला कर्जबाजारीपणा हेच प्रमुख कारण असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने पुन्हा एकदा ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन आणि कुटुंबाचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत. या घटनेमुळे ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यांबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
Leave a Reply