पाक लष्करप्रमुखांच्या त्या विधानांमुळे काश्मीरमधील रक्तपाताला खतपाणी?

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भडकाऊ वक्तव्यांचा परिणाम असू शकतो, असा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची मुख्य रक्तवाहिनी” (lifeline) म्हणत हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणारे विधान केले होते. या विधानामुळे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तोयबाच्या प्रॉक्सी संघटनेला हल्ला घडवून आणण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची शक्यता आहे.

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पहलगाममधील संभाव्य भेट लक्षात घेता, हा हल्ला त्या पार्श्वभूमीवरच घडवून आणला गेला असावा, अशी तपास यंत्रणांची प्राथमिक शक्यता आहे. जरी अद्याप याचे अधिकृत निष्कर्ष समोर आले नसले, तरी अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, मुनीर यांच्या विधानांनी TRF सारख्या दहशतवादी संघटनांना हिंसाचारासाठी उकसवले असावे.

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असू शकतो. त्याचबरोबर रावलकोटमधील कमांडर अबू मुसा आणि आणखी दोन वरिष्ठ दहशतवाद्यांची भूमिका तपासली जात आहे.

१८ एप्रिल रोजी रावलकोट येथे आयोजित कार्यक्रमात अबू मुसा याने काश्मीरमधील जिहाद सुरूच राहील आणि बंदुका व शिरच्छेद थांबणार नाहीत, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्याच्या मते, भारत सरकार अधिवास प्रमाणपत्र देऊन काश्मीरच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल घडवू पाहत आहे. हल्ल्याच्या वेळी काही पीडितांना “कलमा” (धार्मिक घोषवाक्य) म्हणण्यास सांगण्यात आले होते. जे पीडित हे उच्चारू शकले नाहीत, त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, भारतातील वक्फ कायद्यातील प्रस्तावित बदलांबाबतच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हिंदूविरोधी प्रचाराचा उपयोग आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा संघटित करण्यासाठी करत असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे.

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, या हल्ल्यामध्ये सुमारे सहा दहशतवाद्यांचा सहभाग होता आणि स्थानिक मदतनीसांच्या सहाय्याने त्यांनी ही कारवाई केली. हे हल्लेखोर काही दिवसांपूर्वीच या परिसरात आले होते आणि त्यांनी काही हॉटेल्सवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही गंभीर त्रुटी झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असेही तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *