मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबतच्या चर्चांना आता राजकीय रंग चढू लागला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. तसेच, याबाबत स्थानिक पातळीवर आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले होते. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
“२०१९ साली असा सर्वे केला असता तर…”
संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले की, “२०१९ साली ते जेव्हा महाविकास आघाडीत गेले, तेव्हा असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. आज एकच शिवसेना असती. म्हणून कदाचित हे शहाणपण सुचलं असेल.” राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवण्याऐवजी काही लोक युतीमध्येच अडकले असल्याची टीकाही त्यांनी केली. सध्या मनसेसाठी राज्यातील हिंदी सक्तीला विरोध करणे हा सर्वाधिक महत्त्वाचा विषय असून, त्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“अचानक उत्साह का वाटायला लागला?”
देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्हाला आता महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा हे जास्त महत्त्वाचे आहे. आमचा त्यादृष्टीने विचार सुरू आहे. काल जो उत्साह दिसला तो १९ वर्षांत कधीच दिसला नाही. अचानक उत्साह का वाटायला लागला? अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत चार महिन्यांपूर्वी आम्हाला बोलले होते की, बाळासाहेबांचा फोटो का लावत आहात? अचानक सगळे सकारात्मक झाले याला कारण काय?” असे सवाल त्यांनी केले.
“दबावाचं राजकारण करू नका”
संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला. “आज त्यांचे २० आमदार आले आहेत. हे जर ६० आमदार आले असते तर शिवसैनिक इतके सकारात्मक तरी दिसले असते का? २०१७ साली आम्ही प्रस्ताव दिला, तेव्हा शिवसैनिक सकारात्मक नव्हते. २०१४ साली आम्ही प्रस्ताव दिला त्यावेळेस त्यांचे शिवसैनिक सकारात्मक नव्हते. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह नव्हता?” असे प्रश्न त्यांनी विचारले.
ते पुढे म्हणाले, “मी समजू शकतो की, तुमच्यावर वाईट वेळ आली आहे. तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष आपण कसा पुढे न्यावा, त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही गैर आहे, असे मला म्हणायचे नाही. पण, त्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्यावेळी त्याचा निर्णय घ्यायचा त्यावेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला. तसेच, “शरद पवारांसोबत जाण्याबाबत कार्यकर्त्यांना विचारलं का? काँग्रेससोबत जाऊ का, यासाठी बैठका घेतल्या का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करून ठाकरे गटाच्या दुहेरी भूमिकेवर बोट ठेवले.


Leave a Reply