भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढत असून, २०२७ पर्यंत या क्षेत्रातील एकूण महसुलाचा मोठा हिस्सा डिजिटल मीडियाचा असेल, असा अंदाज ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री – इर्न्स्ट अँड यंगच्या (FICCI-EY) संयुक्त अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, परवडणाऱ्या डेटा दरांमुळे आणि नागरिकांच्या वाढत्या आकांक्षांमुळे डिजिटल माध्यमांचा प्रसार अधिक वेगाने होत आहे. ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री – इर्न्स्ट अँड यंग (FICCI-EY) अहवालानुसार, २०२७ पर्यंत डिजिटल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग हे संपूर्ण मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या ४६ टक्के महसुलाचा वाटा उचलतील. याउलट, पारंपरिक माध्यमे जसे की टेलिव्हिजन, प्रिंट, चित्रपट, रेडिओ आणि आउट-ऑफ-होम (OOH) मीडिया—यांचा महसुलातील वाटा ४१ टक्क्यांवर मर्यादित राहील.
अहवालानुसार, २०२७ पर्यंत जाहिरातींमधून मिळणारा महसूल एकूण मीडिया उद्योगाच्या ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जो २०२४ मध्ये ५१ टक्के होता. मात्र, सबस्क्रिप्शन उत्पन्नात घट होण्याचा अंदाज आहे. २०२४ मध्ये सबस्क्रिप्शनचा वाटा ३९ टक्के होता, तो २०२७ पर्यंत ३५ टक्क्यांवर घसरेल.
भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र पुढील तीन वर्षांत वार्षिक सरासरी ७ टक्के दराने वाढेल, असा अहवालाचा अंदाज आहे. २०२७ पर्यंत या क्षेत्राच्या एकूण उत्पन्नात ५६४ अब्ज रुपयांची वाढ अपेक्षित आहे. या वाढीमध्ये डिजिटल माध्यमांचा ६८ टक्के वाटा असेल, तर थेट कार्यक्रम (लाईव्ह इव्हेंट्स) १२ टक्के आणि अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) ८ टक्के योगदान देतील.
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, २०२४ मध्ये डिजिटल माध्यमांनी प्रथमच टेलिव्हिजनला मागे टाकत मीडिया क्षेत्रातील सर्वात मोठा विभाग बनला. २०२४ मध्ये डिजिटल मीडियाचा उद्योगाच्या एकूण उत्पन्नात ३२ टक्के वाटा होता. २०२७ पर्यंत डिजिटल मीडिया ११.२ टक्के वार्षिक वाढ दर्शवेल, तर टेलिव्हिजनमध्ये -०.६ टक्के नकारात्मक वाढ होईल. त्यामुळे प्रेक्षकांचा कल हळूहळू ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
अहवालानुसार, पारंपरिक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांपेक्षा लोक आता अधिक प्रमाणात ऑनलाइन व्हिडिओ आणि डिजिटल मजकूराचा स्वीकार करत आहेत. विशेषतः तरुण प्रेक्षक सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरच बातम्या पाहण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वृत्त माध्यमांनी त्यांच्या सामग्री वितरण आणि महसूल स्रोतांसाठी नवीन रणनीती आखणे आवश्यक आहे.
मीडिया उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निष्कर्ष
• डिजिटल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंग हे मीडिया उद्योगाच्या महसुलाचा सर्वाधिक मोठा भाग बनणार.
• पारंपरिक माध्यमांचा वाटा तुलनेने कमी होणार.
• जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल, मात्र सबस्क्रिप्शन उत्पन्न घटेल.
• डिजिटल मीडिया आणि ऑनलाईन कंटेंटचा वेगाने विस्तार होणार.
• भारतीय मीडिया उद्योग २०२७ पर्यंत ५६४ अब्ज रुपयांनी वाढण्याची शक्यता.
भारतातील डिजिटल माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढत असून, २०२७ पर्यंत मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात डिजिटलचे वर्चस्व राहील. त्यामुळे पारंपरिक माध्यम कंपन्यांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे अनिवार्य ठरणार आहे.
Leave a Reply