संस्कृत साहित्याचे डिजिटायझेशन : आयआयटी-मुंबई पदवीधराची मोफत ऑनलाईन ज्ञानसंपदा

आयआयटी-मुंबईचे पदवीधर आणि सॉफ्टवेअर अभियंता अंतरिक्ष बोथाले यांनी प्राचीन संस्कृत साहित्य सर्वसामान्यांपर्यंत मोफत व सुलभ स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने SanskritSahitya.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे. भाषा आणि संगणकीय भाषाशास्त्रातील त्यांचा व्यासंग या अभिनव उपक्रमामागे आहे. संस्कृत ग्रंथांचे डिजिटायझेशन आणि त्यावरील अभ्यास सुसंगत पद्धतीने साधण्यासाठी त्यांचे हे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.

राजस्थानच्या जोधपूर येथील रहिवासी असलेले श्री. बोथाले हे आयआयटी मुंबईचे पदवीधर असून, त्यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातून संगणकीय भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते कॅलिफोर्नियामधील गुगल कंपनीत स्मार्ट होम असिस्टंट प्रकल्पावर कार्यरत आहेत. २०११ पासून www.linguistrix.com या ब्लॉगच्या माध्यमातून ते भाषाविज्ञानविषयक लेखन करत आहेत.

“संस्कृत साहित्याचा अभ्यास, वाचन आणि विश्लेषण संगणकीय प्रणालींच्या सहाय्याने अधिक सुसंगत आणि वापरकर्ताभिमुख करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे बोथाले यांनी स्पष्ट केले. SanskritSahitya.org या संकेतस्थळावर विविध संस्कृत ग्रंथ श्लोक, सर्ग, अध्याय, कांड यानुसार विभागून संरचित पद्धतीने सादर करण्यात आले आहेत. मूळ संस्कृत मजकुरासोबतच छंदवर्गीकरण, भाष्य, भाषांतर आणि शब्दरचना विश्लेषण यांचा समावेश असून, या साहित्याचा नियमित अद्ययावत करणाही केला जात आहे.

पाणिनीय सूत्रे किंवा कोशसंदर्भ यांसारख्या माहितीशी थेट लिंक जोडण्यात आल्या असून, त्यामुळे अभ्यासकांना सखोल माहिती मिळवणे अधिक सोपे होते. छंदांचे ऑडिओ प्रात्यक्षिक, मीटर टॅगिंग, तसेच देवनागरी आणि रोमन लिपीतील शोध पर्यायामुळे संकेतस्थळाचा उपयोग अधिक व्यापक झाला आहे. “दुर्लभ श्लोक अथवा विशिष्ट छंद शोधणाऱ्या अभ्यासक व शिक्षकांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरेल,” असे बोथाले यांनी सांगितले. लवकरच संकेतस्थळावर मूळ शब्दावर आधारित शोध सुविधा, श्लोकांचा इंग्रजी सारांश, शब्द निर्देशांक, विविध भारतीय लिप्यांमधील सादरीकरण, तसेच श्लोक जतन करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

“संपूर्ण मजकूर काही सेकंदांत डाउनलोड करून ऑफलाइन स्वरूपातही वापरता येतो,” असेही त्यांनी नमूद केले. अभ्यासकांसाठी मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषणासाठी github.com/sanskritsahitya-com/data या गिटहब रिपॉझिटरीचा उपयोग शक्य आहे. सध्या संकेतस्थळावर रामायण, महाभारत, भगवद्गीता, कालिदास व इतर कवींची महाकाव्ये व काव्यसाहित्य, तसेच विविध लोकप्रिय ग्रंथ सहज उपलब्ध आहेत.

“संस्कृत साहित्य म्हणजे आपल्या सांस्कृतिक परंपरेची खिडकी आहे. यातून आपल्याला मानवी भावना, विनोद, प्रेम आणि दैनंदिन जीवनावरील सूक्ष्म निरीक्षणे समजतात. हे साहित्य केवळ धार्मिक न राहता, मानवजीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे आहे,” असे बोथाले यांनी नम्रपणे सांगितले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *