राज्यात मतचोरीविरोधातील ऐल्गार सभा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करून राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवली आहे.
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले, “मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण आमच्याकडील माहितीनुसार ५ नोव्हेंबरला नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका जाहीर होतील. १५ डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान होईल. त्यानंतर १५ जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील,” असं त्यांनी सांगितलं.
वळसे पाटलांनी यावेळी कार्यकर्त्यांना “लगेच कामाला लागा” अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी विरोधक मात्र या अंदाजे वेळापत्रकावरून प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत वेळापत्रक घोषित केलेले नाही, त्यामुळे वळसे पाटलांना ही माहिती कुठून मिळाली, हा प्रश्नही चर्चेत आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली असून, भेटीगाठी, दौरे आणि बैठका वेगाने सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्येही रणनीती आखण्याची चुरस सुरू झाली आहे.
वळसे पाटलांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला नवी दिशा मिळाली असून, हा फक्त ‘अंदाज’ आहे की ‘आतली माहिती’, याबाबत आता सर्वांचं लक्ष निवडणूक आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागलं आहे.


Leave a Reply