धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीत अभुतपूर्व असा निकाल लागला आहे. राज्यातील विविध ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच दोंडाईचाने एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण २६ जागांवर आणि नगराध्यक्ष पदावर भाजपची बिनविरोध निवड निश्चित केली आहे. या निमित्ताने दोंडाईचा ही राज्यातील पहिली पूर्ण बिनविरोध नगरपरिषद ठरली आहे.
दोंडाईचा नगरपरिषद स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार होती. मात्र नामनिर्देशन प्रक्रियेनंतर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एकतर्फी झाली. नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीच्या शरयू भावसार यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु त्यांच्या वडिलांची घरपट्टी थकबाकी असल्याचा आक्षेप भाजपने घेतला आणि त्यानुसार त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. या निर्णयाविरोधात भावसार कुटुंबियांनी धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.
दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीपूर्वीच भाजपने तीन ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष पद पटकावले आहेत. सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामध्ये नयन कुमार रावल आणि जळगावच्या जामनेरमध्ये साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दोंडाईचातील या बिनविरोध निकालामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाने विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. दुसरीकडे विरोधकांच्या माघारीमुळे दोंडाईचाची पहिलीच निवडणूक स्पर्धेविना पार पडल्याची नोंद इतिहासात झाली आहे.


Leave a Reply