पुणे : ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना गेल्या दहा दिवसांपासून शहरातील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे आणि आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
डॉ. आढाव यांच्या प्रकृतीची बातमी समजताच त्यांच्या अनुयायांमध्ये, समाजकार्यातील सहकाऱ्यांमध्ये आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून कुटुंबीयांनी संयमाचे आवाहन केले आहे.
श्रीमती शीला आढाव, असीम आढाव आणि अंबर आढाव यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “बाबांवर अपरिमित प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांची काळजी सर्वांनाच वाटते. मात्र हॉस्पिटलमध्ये इतरही गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी आणि बाबांच्या उपचार प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कोणीही हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये ही नम्र विनंती आहे.”
तसेच, बाबांच्या प्रकृतीविषयीची माहिती कुटुंबीयांकडून दिवसातून दोन वेळा सामाजिक माध्यमांद्वारे अधिकृतरीत्या प्रसारित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.समाजकार्यातील सत्याग्रही परंपरा जपणारे आणि कामगार संघटनांचे नेतृत्व करणारे डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सामाजिक वर्तुळातून प्रार्थना व्यक्त होत आहेत.


Leave a Reply