उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सुनेहरा गावात जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसक घटनेत एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपासाची गती वाढवण्यात आली आहे.
सोमवारी रात्री ६२ वर्षीय शीला देवी घरासमोर बसल्या असताना, भरधाव वेगाने आलेल्या महिंद्रा थार वाहनामुळे गावकरी भूपेंद्र यांनी चालकास सावधगिरी बाळगण्यास सांगितले. या सूचनेवरून वाहनचालक तपेश सिंग आणि त्यांचा मुलगा प्रियांशू सिंग यांनी गावकऱ्यांशी वाद घालत जातीय अपशब्दांचा वापर केला आणि तेथून निघून गेले.
मात्र, काही वेळातच ते सहा जणांसह परत आले आणि वाहनाचा वापर करून जाणीवपूर्वक गावकऱ्यांवर हल्ला केला. एफआयआरनुसार, आरोपींनी वाहन अनेक वेळा पुढे-मागे चालवत लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शीला देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक शंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपेश कुमार, प्रियांशु सिंग, वरुण कुमार, अतुल सिंह, कृष्णा सिंह आणि मानव कुमार यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकी, दंगल घडवणं आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले असून, या अमानुष कृत्यावर समाजातील विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. बुलंदशहरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून, स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत.
Leave a Reply