ईव्हीएम तुटवड्यामुळे छत्रपती संभाजीनगरात कमी होणार मतदान केंद्रे

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवाळीनंतर नगरपालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम तुटवड्याचे संकट निर्माण होणार असल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रे कमी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा १०० हून अधिक केंद्रे कमी होतील, असा अंदाज आहे.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात १९६० मतदान केंद्रे होती. त्यानंतर मतदारसंख्या वाढल्याने ही संख्या २३२८ पर्यंत पोहोचली होती. मात्र, यंदा ईव्हीएमच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे ही संख्या घटवावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एका मतदान केंद्रावर आधी १२०० मतदारांची मर्यादा होती; परंतु आता १४०० ते १५०० मतदारांना एकाच केंद्रावर मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांची गर्दी वाढणार असून सोयीसुविधांवर परिणाम होणार आहे.

गेल्या निवडणुकांमध्ये गंगापूर तालुक्यात ७५, पैठणमध्ये ९७, खुलताबादमध्ये ९३, सोयगावमध्ये ३९, संभाजीनगर तालुक्यात ३०, कन्नडमध्ये १२९ आणि वैजापूरमध्ये ९६ मतदान केंद्रांची वाढ झाली होती. ही अतिरिक्त केंद्रे आता कमी होण्याची शक्यता आहे.

आयोगाने ईव्हीएमच्या मर्यादित साठ्याचा विचार करून मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सुमारे १८ हजार ईव्हीएमची कमतरता भासणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारांना पूर्वीपेक्षा अधिक अंतरावर मतदान केंद्रावर जावे लागू शकते.

या परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेत काही अडचणी निर्माण होऊ शकतात. वाढलेल्या मतदारसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रे कमी होणे हा निर्णय प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आता आयोग यावर कोणते पर्याय शोधतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *