मुंबई – राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन अनिवार्य असतानाच, आता राज्यगीत गायनही अनिवार्य करण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या राज्यातील विविध शिक्षण मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्यासह सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डांच्या शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भुसे म्हणाले की, सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रिज मंडळातील शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेत मराठी विषयाचा समावेश असला पाहिजे. यासाठी संबंधित मंडळांशी पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच राज्य मंडळाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यासक्रम आयसीएसई बोर्डाच्या पुस्तकांमध्येही असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंटरनॅशनल बोर्डच्या अभ्यासक्रमात मानव्यविद्या विषयांत महाराष्ट्राच्या इतिहासाचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला. दिव्यांग आणि कमी अध्ययन क्षमतेचे विद्यार्थी यांचा सर्वसमावेशक शिक्षणात समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज अधोरेखित करताना भुसे यांनी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची आणि शालेय शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावरही भर दिला.
‘राष्ट्र प्रथम’ ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, इतर बोर्डांच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांना मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. बैठकीदरम्यान विविध मंडळांच्या समन्वयक आणि प्राचार्यांनी त्यांच्या शाळांमधील उपक्रम, अध्ययन-अध्यापनाच्या पद्धती आणि मूल्यमापन प्रक्रियेविषयी माहिती सादर केली.
Leave a Reply