मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. हे सर्व जण बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा भाग असल्याचे भासवत लंडनला जाण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सदर प्रकरणात सात जणांनी स्वतःला हरियाणातील एका खासगी विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचे भासवले होते, तर एका व्यक्तीने प्राध्यापक असल्याचा बनाव रचला होता. या सर्वांवर मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे विमानतळावरील इमिग्रेशन तपासणी दरम्यान या प्रवाशांना थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, ती बनावट असल्याचे उघड झाले.
तसेच, युकेचा व्हिसा मिळवण्यासाठी त्यांनी खोटी माहिती पुरवल्याचे समोर आले. या आठ जणांना एका एजंटने लंडनपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते, यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये आकारण्यात आले होते. हे प्रवासी जेद्दाहमार्गे लंडनला जाणार होते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान प्रवाशांना त्यांच्या विद्यापीठाचा तपशील विचारला, मात्र ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे अधिक संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कटातील तथाकथित ‘प्राध्यापकाने’ अधिकाऱ्यांना सांगितले की, तो हरियाणातील विद्यापीठाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांसह लंडनला जात आहे. मात्र, त्यानेही संबंधित विद्यापीठाबाबत कोणतीही ठोस माहिती देऊ शकली नाही.
तपासादरम्यान प्रवाशांनी उघड केले की, दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांनी एजंट आणि बिट्टू नावाच्या व्यक्तीला भेटले होते. या एजंटनेच त्यांना यूकेमध्ये बेकायदेशीररीत्या स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणातील आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे यूके दूतावासात व्हिसासाठी अर्ज दाखल केला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुढील तपासासाठी या आठ जणांना सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही मुंबई पोलिसांनी अशाच एका मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये ८० हून अधिक लोकांना बनावट पासपोर्ट आणि व्हिसाच्या मदतीने कॅनडा, तुर्की, नेदरलँड्स आणि पोलंडमध्ये पाठवले जात होते.
Leave a Reply