मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘कमी बोला, जास्त काम करा’ असा कानमंत्र देत, त्यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर आणि जनसामान्यांमध्ये पक्षाचे स्थान अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले, तसेच निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.
अनावश्यक बोलण्यामुळे पक्षाला नुकसान नको
शिंदे यांनी आमदारांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका.” त्यांनी आमदारांना विरोधकांना सामोरे जाताना स्वतः ‘एक्स्पोज’ न होण्याचा सल्ला दिला. केलेल्या कामांची ‘ब्रेकिंग न्यूज’ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, ज्यामुळे पक्षाच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल.
शाखा मजबूत करण्यावर भर
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मजबूत केलेल्या शाखांच्या जाळ्याला अधिक बट्ट करण्यासाठी शिंदे यांनी ‘घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर जोर दिला. कंटेनर शाखेचा ‘कॉन्सेप्ट’ ठिकठिकाणी राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शाखा लोकांना आधार वाटतात, असे त्यांनी नमूद केले.
निवडणुकीसाठी सज्जता आणि उमेदवारांची निवड
आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत, शिंदे यांनी एकजुटीने काम करण्यावर भर दिला. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार महत्त्वाचा असल्याचे सांगताना, “उमेदवार चुकला की संपलं,” असे ते म्हणाले. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी उद्दिष्ट ठरवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड नाही
मराठी भाषेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचे ते करणार आणि दिलेला शब्द पाळणार असल्याने मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा
शिंदे यांनी ‘एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही’ यावर विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्याला मोठं केल्यास पक्ष आपोआप मोठा होतो, असे ते म्हणाले. शिवसैनिक हे पद सर्वात मोठे आहे हे लक्षात ठेवण्यास सांगत, कार्यकर्ता नेता तयार करतो आणि पक्ष घडवतो, त्यामुळे कार्यकर्त्याला जपले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार किंवा मंत्री झालो, ही हवा डोक्यात न जाऊ देता कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शाखाप्रमुखापासून ते मुख्य नेत्यांपर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Leave a Reply