उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतंच खैरे यांनी दानवे यांच्यावर टीका करत निवडणुकीत तिकीट वाटप करताना आपल्याला विश्वासात न घेता कोणालाही तिकिटाचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खैरे आणि दानवे वाद चव्हाट्यावर आला आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारी ठरवताना मला विचारले गेले नाही. अंबादास दानवे अन्य पक्षातून कार्यकर्ते आणत. त्यांना उमेदवारी देत. उमेदवारी दिल्यानंतर आपण त्या उमेदवारांचे इमाने इतबारे काम केले. पण तेव्हा उमेदवारी देताना आपले मत विचारले गेले नव्हते. आजही विविध प्रकारच्या नियोजनात, उपक्रमात दानवे आपणास विश्वासात घेत नाहीत, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. नाव न घेता ते आरोप करत होते.
पत्रकार बैठकीत अंबादास दानवे यांचे नाव न घेता ते आरोप करत होते. त्याचे नाव घेण्याची वेळ आली की, ‘तो नेता तुम्ही समजून घ्या ना ’ असे ते म्हणत होते. मात्र पत्रकार बैठकीत शेवटी त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारी देताना आपणास विचारलेच गेले नाही, याचा उल्लेख करताना त्यांनी दानवे यांचे नाव घेऊन टीका केली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटास मोठी गळती लागल्याचे चित्र दिसत असले तरी संघटना मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख राजू वैद्य यांनी चंद्रकांत खैरे यांच्याविषयी काही कारणास्तव नाराजी असल्याचा उल्लेख राजीनामा पत्रात केला होता. त्यांच्याविषयी फारसे बोलणार नाही. पण त्यांनाही त्याच नेत्याने उमेदवारी दिली होती, असा उल्लेख करत खैरे म्हणाले, राजू वैद्य यांनी शिवसेनेच्या महापौरांना त्रास दिला. शहरातील अनेक विकास योजनांमध्ये मोडता घातला. त्यांनी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांना ‘ ब्लॅक मेल ’ केले होते, असा आरोपही केला.
Leave a Reply