जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या टेस्ला कंपनीला सायबर गुन्हेगार सातत्याने लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत टेस्लाच्या अनेक गाड्यांना आग लावण्यात आली होती, तर आता ‘डोजक्वेस्ट’ या वेबसाइटने टेस्ला कार मालकांची वैयक्तिक माहिती लीक केली आहे. त्यामुळे टेस्ला मालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘डोजक्वेस्ट’ वेबसाइटने अमेरिकेतील टेस्ला कार मालकांची नावे, रहिवासी पुरावे आणि फोन नंबर सार्वजनिक केले आहेत. इतकंच नाही, तर टेस्लाच्या डीलरशिप आणि चार्जिंग स्टेशनचा परस्परसंवादी नकाशा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे टेस्ला कार मालकांची सुरक्षा धोक्यात आल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या वेबसाइटवरील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कर्सर म्हणून पेट्रोल बॉम्बची बॉटल दाखवण्यात आली आहे. टेस्ला कार मालकांनी त्यांची इलेक्ट्रिक कार विकल्याचा पुरावा दिला, तरच त्यांची माहिती वेबसाइटवरून काढून टाकली जाईल, असा इशारा हल्लेखोरांनी दिला आहे.
या घटनेनंतर एलॉन मस्क यांनी त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या हल्ल्याला ‘देशांतर्गत दहशतवाद’ असे संबोधले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
‘डोजक्वेस्ट’ ही वेबसाइट कोण चालवतंय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, अमेरिकेतील संघीय अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वेबसाइटचा डोमेन एका अनोळखी होस्टिंग सेवेद्वारे लपवण्यात आला आहे, त्यामुळे संशय अधिकच वाढला आहे.
टेस्लाच्या शेअर्समध्ये ५०% पेक्षा जास्त घसरण झाली असून, कंपनीला ८०० अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे. गुंतवणूकदारांचा मस्क यांच्यावरील विश्वास कमी होत असून, कंपनीचे नाव व प्रतिष्ठा गमावत असल्याची चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सुरुवातीचे गुंतवणूकदार रॉस गर्बर यांनी मस्क यांना CEO पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर आवाहन केले आहे. मस्क यांच्या राजकीय भूमिकेमुळे कंपनीचे नुकसान होत असल्याचा आरोप रॉस गर्बर यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये टेस्लाच्या शोरूमबाहेर २५० निदर्शकांनी आंदोलन केले. ‘टेस्ला जाळा, लोकशाही वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून, या विरोधात कडक कारवाई केली जाऊ शकते.
टेस्लाच्या कार मालकांची माहिती लीक होणे, सायबर धमक्या आणि वाढती निदर्शनं या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि टेस्ला मोठ्या संकटात सापडली आहे.टेस्लाच्या कार मालकांची माहिती लीक होणे, सायबर धमक्या आणि वाढती निदर्शनं या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क आणि टेस्ला मोठ्या संकटात सापडली आहे.
Leave a Reply