सांगली : सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “जयंत पाटील भाजपमध्ये आले तरी गोपीचंद पडळकरच सांगलीत सीनियर ठरतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागेच राहतील.” सभेत बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्या घोषणाबाजीवरही टिका केली. “आम्ही नाश करणार, उद्या सांगलीत नाश होईल,” असे वक्तव्य करत त्यांनी जयंत पाटील यांच्या आंदोलनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनीही इस्लामपूर येथे आयोजित सभेत जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नसून लुटारू आणि गुंडांची टोळी आहे.” तसेच सांगली जिल्ह्यातील बँकांमधील गैरव्यवहार आणि ऑनलाइन लॉटरी व्यवसायावर आलेल्या संकटासाठी जयंत पाटील जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. खोत यांनी राजारामबापू पाटील यांची विकासाची परंपरा जयंत पाटील यांनी पुढे नेली नसल्याचे सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. “सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे, मात्र आपल्या माणसांना वाचवण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग करणे योग्य नाही,” असे खोत म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी भाषणात विरोधकांवर अप्रत्यक्ष हल्ले चढवले. त्यांनी स्पष्ट केले की, “विरोधकांच्या टीकेला घाबरून आम्ही थांबणार नाही. जयंत पाटील यांच्या मेंदूला अजून काही झाले नाही, त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. सांगली जिल्ह्यातील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून जयंत पाटील यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता आहे.
Leave a Reply