मुंबई | राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2,059 मंडळांमधील शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ मिळणार आहे.
या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायती शेतकऱ्यांना 27,000 रुपये तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पूरामुळे खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 47 हजार रुपये तर मनरेगा योजनेच्या माध्यमातून हेक्टरी 3 लाख रुपये जमिनी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी देण्यात येतील.
बाधित विहिरींसाठी आणि गाळ काढण्यासाठी 30 हजार रुपयांपर्यंतची मदत मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय दुग्धाळ जनावरांसाठी 37,500 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी मदतीसाठी 65 मिलीमीटर पावसाची अट आवश्यक राहणार नाही, अशीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मते, या पॅकेजमधील 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम फक्त पिकांसाठी राखून ठेवण्यात आली असून, ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. पूर, अतिवृष्टी आणि जमिनीच्या धूपीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
Leave a Reply