सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातील सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या गलिच्छ शब्दातील टीकेनंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला आहे. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून, शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकरांच्या विधानाला पाठिंबा न दर्शवता त्यांचे कान टोचले. “कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुटुंबीयांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे योग्य नाही. गोपीचंद पडळकरांशी मी याबाबत चर्चा केली असून अशा भाषेचा वापर भविष्यात टाळावा, असे त्यांना स्पष्ट सांगितले आहे,” असे फडणवीस म्हणाले. तसेच, शरद पवारांशीही बोलून भाजप अशा वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी पडळकरांना सल्ला देताना, “तुमच्यात आक्रमकपणा आहे; मात्र बोलताना शब्दांची पातळी लक्षात ठेवावी लागेल. भविष्यात मोठ्या संधी मिळवायच्या असतील तर विचारपूर्वक वक्तव्य करणे आवश्यक आहे,” असे सांगितले.
दरम्यान, पडळकरांनी जयंत पाटलांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात हल्ला चढवला होता. पाटील यांना “बिनडोक” म्हणत, “ते भिकाऱ्याची औलाद नाहीत” अशा वादग्रस्त टीका त्यांनी केल्या. तसेच स्वतःवर अन्याय झाल्याचा आरोप करत, जयंत पाटलांनीच कट रचल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणामुळे विरोधकांनी पडळकरांवर जोरदार टीका सुरू केली आहे. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त करत स्पष्ट संदेश दिल्याने या वादाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Leave a Reply