कोल्हापूर/इचलकरंजी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या एका बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीच्या बनावट नोटा, तसेच त्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यासह एकूण २ लाख ६१ हजार २७० रुपयांचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस संतोष बरोरे आणि प्रदीप पाटील यांना इचलकरंजी येथील नारायण टॉकीज परिसरात काही व्यक्ती बनावट नोटा चालवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी अनिकेत विजय शिंदे (वय २९, रा. इचलकरंजी), राज रमेश मनाधी (वय १९, रा. इचलकरंजी) आणि सोबळ अमराऊज कलावंत (वय १९) या तीन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या बनावट नोटांमध्ये ३९२ नोटा ५०० रुपयांच्या आणि २९२ नोटा २०० रुपयांच्या आहेत. या नोटा हुबेहूब असल्यामुळे त्या ओळखणे सामान्य माणसाला कठीण आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Leave a Reply