ठाणे : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या अँटी-इव्हेझन विभागाने तब्बल ४७ कोटी ३२ लाख रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड विवेक मोईत्रा याला न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सध्या त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजीएसटी विभागाने गुप्तचर यंत्रणेच्या साहाय्याने तांत्रिक विश्लेषण करून ही मोठी कारवाई केली. तपासादरम्यान मोईत्रा यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असता, अनेक बँक पासबुक, चेकबुक, मोबाईल तसेच बनावट कंपन्यांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले.
या चौकशीत मोईत्रा यांनीच घोटाळ्याचे मास्टरमाइंड असल्याची कबुली दिली असून, त्यांनी कमिशन स्वरूपात आर्थिक लाभ घेतल्याचेही मान्य केले. त्याला १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.या प्रकरणाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे बिलं तयार केली जात होती; मात्र त्यामागे कोणताही वास्तविक मालाचा पुरवठा होत नव्हता. वस्तूंचा पुरवठा न करता केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून मोठ्या प्रमाणात आयटीसीचा गैरवापर करण्यात आला होता. जीएसटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे शासनाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही जणांचा यात समावेश असल्याची शक्यता नाकारली जात नाही. आर्थिक घोटाळ्यांच्या मालिकेत ही आणखी एक मोठी घटना ठरली आहे. सरकारकडून करचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे कायद्याच्या अंमलबजावणीसमोरील आव्हानं वाढत आहेत. ठाण्यातील या कारवाईमुळे राज्यभरातील करचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
Leave a Reply