बहुजन समाज पक्षात (बसपा) कौटुंबिक वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. पक्षप्रमुख मायावती आणि त्यांचे पुतणे आकाश आनंद यांच्यातील मतभेदांनंतर, आता त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्याशीही संबंध तणावपूर्ण झाले आहेत. मायावतींनी तीन दिवसांपूर्वी आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले. त्यानंतर ही जबाबदारी त्यांचे वडील आनंद कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आनंद कुमार यांनी ही अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे मायावतींनी बुधवारी त्यांच्या हातून हे पद परत घेतले.
मायावतींचा निर्णय; रणधीर बेनीवाल यांना संधी बुधवारी सकाळी, मायावतींनी X (ट्विटर) वर दोन पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. आनंद कुमार यांनी एका पदावरच काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहतील, मात्र राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली जात आहे. त्याचबरोबर, पक्षात मोठे बदल जाहीर करत सहारनपूरचे रणधीर बेनीवाल यांना राष्ट्रीय समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मायावतींनी स्पष्ट केले की, राज्यसभा खासदार रामजी गौतम आणि रणधीर बेनीवाल हे दोघेही राष्ट्रीय समन्वयक म्हणून माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम पाहतील. याआधी, आकाश आनंद यांचे सासरे आणि नंतर आकाश यांनाही पक्षातून हाकलण्यात आले होते.
मायावतींनी ३ मार्च रोजी आकाश आनंद यांना पक्षातून काढून टाकले. त्यांनी पश्चात्ताप करून परिपक्वता दाखवायला हवी होती. पण त्यांच्या प्रतिक्रिया राजकीय परिपक्वतेच्या चौकटीत बसत नाहीत. ते त्यांच्या सासरच्यांच्या प्रभावाखाली स्वार्थी आणि अहंकारी बनले आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
१५ महिन्यांत दोनदा उत्तराधिकारी, पण दोन्ही वेळा अपात्र!
• १० डिसेंबर २०२३ – आकाश आनंद यांना पहिल्यांदा मायावतींचे उत्तराधिकारी घोषित करण्यात आले.
• ७ मे २०२४ – त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या.
• २३ जून २०२४ – त्यांना पुन्हा उत्तराधिकारी बनवले गेले, तसेच राष्ट्रीय समन्वयक पदही मिळाले.
• २ मार्च २०२५ – पुन्हा सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या.
• ३ मार्च २०२५ – आकाश यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
सहारनपूरचे रणधीर बेनीवाल हे जाट समुदायाचे प्रभावी नेते मानले जातात. ते बऱ्याच काळापासून बसपाशी जोडलेले असून, उत्तर प्रदेशातील जाट बहुल भागात त्यांची मजबूत पकड आहे.


Leave a Reply