गेवराई, बीड: छत्रपती मल्टिस्टेटसमोर आपल्याच ठेवीचे पैसे परत न मिळाल्याने शेतकरी सुरेश आत्माराम जाधव (वय ४६, रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश जाधव यांच्या पत्नी कविता जाधव (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष उर्फ नाना बसंता भंडारी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जाधव यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी २०२० पासून छत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई शाखेत ११ लाख ५० हजार रुपयांची मुदत ठेव (FD) ठेवली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते वारंवार आपल्या ठेवीचे पैसे परत मिळावे म्हणून मल्टिस्टेटकडे पाठपुरावा करत होते, मात्र त्यांना “आज देतो, उद्या देतो” असे सांगून टाळाटाळ केली जात होती. सहा महिन्यांपूर्वी सुरेश जाधव यांनी मल्टिस्टेटच्या कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेअरमन संतोष भंडारी यांनी त्यांना २ लाख ५० हजार रुपये परत केले आणि उर्वरित ९ लाख रुपये दोन महिन्यांत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना उर्वरित रक्कम मिळाली नाही. यामुळे सुरेश जाधव प्रचंड मानसिक तणावाखाली होते. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते अधिकच अस्वस्थ होते.
१७ जून २०२५ रोजी सुरेश जाधव आपल्या पत्नी कविता आणि दोन्ही मुलांसह दिवसभर छत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई शाखेत पैसे मागण्यासाठी थांबले होते. मात्र, शाखा व्यवस्थापक क्षीरसागर यांनी त्यांना दिवसभर पैसे दिले नाहीत, उलट सुरेश जाधव यांना अर्वाच्च भाषेत बोलून शाखेतून बाहेर काढले. तरीही ते तिथेच थांबले होते. याचवेळी, शाखेत दारू पिणारा एक व्यक्ती त्रास देत असल्याने कविता जाधव यांनी मुलांना घरी पाठवून दिले आणि त्या स्वतः शाखेतच थांबल्या. त्यांच्यासोबत संभाजीनगर येथील तनया कुलकर्णी आणि प्रतीक्षा कुलकर्णी या दोन महिलाही पैसे घेण्यासाठी तिथे थांबल्या होत्या. सुरेश जाधव यांना त्यांच्या पत्नीने फोन करून मुलांसोबत घरी थांबण्यास सांगितले होते, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
१८ जून २०२५ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास छत्रपती मल्टिस्टेटच्या शटर वाजवण्याचा आवाज आल्याने कविता जाधव आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर आले असता त्यांना पोलीस दिसले. यावेळी शाखेच्या समोर लोखंडी अँगलला सुरेश आत्माराम जाधव यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. बाजूलाच त्यांची मोटारसायकल पडलेली होती.
संतोष उर्फ नाना बसंता भंडारी यांनी वेळेत ९ लाख रुपये परत न दिल्यामुळे सुरेश जाधव यांना दैनंदिन कामे, शेतीची कामे आणि मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याच त्रासाला कंटाळून त्यांनी मल्टिस्टेटच्या कार्यालयासमोरच आत्महत्या केली, अशी फिर्याद पत्नी कविता जाधव यांनी दिली आहे.
या गंभीर घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, सर्वसामान्यांच्या ठेवींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply