वाशी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पवनचक्की प्रकल्पासाठी विद्युत लाईन टॉवर टाकण्याच्या कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली. नुकसानभरपाई (मावेजा) मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, तर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळत, आत्मसंरक्षणासाठी कारवाई केल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील शेतकरी एका पवनचक्की कंपनीकडून दुसऱ्या कंपनीइतकाच मावेजा मिळावा, अशी मागणी करत होते. शेतकऱ्यांनी पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचे काम थांबवले होते. शेतकऱ्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत योग्य मावेजा दिला जात नाही, तोपर्यंत काम पुढे सरकणार नाही.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मावेजा देण्याऐवजी पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले आणि पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. मारहाणीत काही शेतकरी जखमी झाल्याचा दावाही केला जात आहे. घटनेनंतर अनेक शेतकरी वाशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते, त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांची बाजू: “आत्मसंरक्षणासाठी कारवाई, डिझेल घेऊन पेटवण्याचा प्रयत्न”
या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांनी पोलिसांची बाजू मांडली आहे. त्यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराचा आरोप फेटाळून लावला आहे. राठोड यांच्या माहितीनुसार, मावेजा मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसोबत काही लोक हातात डिझेल घेऊन आले होते. त्यांच्याकडे 30 ते 40 जण जखमी होतील एवढा डिझेलचा साठा होता. त्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पोलिसांच्याही अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपाधीक्षक राठोड यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आलेली नाही, तर डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा आणि पोलिसांनाही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी कारवाई करण्यात आली.” याचा अर्थ पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केल्याचं स्पष्ट केलं आहे.
पुढील कार्यवाहीकडे लक्ष
सध्या या प्रकरणावरून शेतकरी आणि पोलीस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अमानुष मारहाण झाली आहे, तर पोलिसांच्या मते त्यांनी केवळ आत्मसंरक्षणासाठी आणि गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी कारवाई केली आहे. आता पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतर शेतकऱ्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे तांदुळवाडी आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.
Leave a Reply