मुलीच्या शिक्षणाची चिंता जडल्याने शेतकरी पित्याची आत्महत्या

धाराशिव : कर्जाचा डोंगर आणि मुलीच्या उच्च शिक्षणाची चिंता या दुहेरी विवंचनेतून धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथील ३८ वर्षीय शेतकरी अमोल नवनाथ डक यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अमोल डक यांच्यावर आधीपासूनच बँकेचे कर्ज होते. त्यात त्यांची मुलगी बारावी उत्तीर्ण झाली असून, सीईटीमध्ये चांगले गुण मिळाल्याने तिला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा होता.मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागणाऱ्या संभाव्य खर्चाची चिंता त्यांना सतावत होती, अशी माहिती त्यांचे नातेवाईक विनोद डक यांनी पोलिसांना दिली.

सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल डक रात्री १०:३० वाजता झोपण्यासाठी गेले. घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर त्यांनी साडीच्या साहाय्याने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. विनोद डक यांनी ढोकी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

कुटुंबकर्ताच गेला…
अमोल डक यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. शेती करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. त्यांच्या आत्महत्येमुळे डक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *