अवकाळीचा फटका: मराठवाड्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; अनेक गावे अजूनही तहानलेली

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यांत विभागात तब्बल १७ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, २७ हजार १०३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात १० हजार १२७ हेक्टरमधील बागायती, ५६५ हेक्टरमधील जिरायती, तर ६ हजार ८५१ हेक्टरमधील फळपिकांचा समावेश आहे. खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या असल्या तरी, मदतीविना शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

नुकसानभरपाई कधी? अहवाल शासनाकडे, पण सूचना नाहीत

महसूल अपर आयुक्त खुशालसिंग परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ९ हजार १२७ गावांमध्ये हे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात आले आहेत, परंतु शासनाकडून अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. जून महिन्यातही १८० गावांमधील ७ हजार २५१ शेतकऱ्यांच्या ४ हजार ९३२.०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यात ४ हजार ८७५ हेक्टर फळपिकांचे नुकसान सर्वाधिक आहे.

पावसाळ्यातही २८९ गावे, ८७ वाड्या तहानलेल्या
पावसाळ्याचे दिवस उलटले असले तरी, मराठवाड्यातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे. विभागातील २८९ गावे आणि ८७ वाड्या अजूनही तहानलेल्या असून, तेथे ४७० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या १ हजार २४२ विहिरींचा आकडा अजूनही कायम आहे. सध्या ४६१ खासगी आणि शासकीय टँकरच्या मदतीने विभागाची तहान भागवली जात आहे. विशेषतः मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, १७५ गावे आणि २४ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हानिहाय टँकरद्वारे पाणीपुरवठा (आकडेवारी)

| जिल्हा | टँकर | गावे | वाड्या |
| छ. सं नगर | २४५ | १६५ | २४ |
| जालना | १८१ | २३ | ५ |
| परभणी | ४ | १ | |
| हिंगोली | २ | ४३ | |
| नांदेड | २ | ४३ | |
| बीड | ० | २ | |
| लातूर | ४ | ४ | |
| धाराशिव | ४ | ४ | |
| एकूण | ४७० | २८९ | ८७ |

इतर नुकसानीची आकडेवारी

दोन महिन्यांत विभागात ६३० दुभती जनावरे दगावली आहेत, ज्यात १६२ लहान दुभत्या आणि ३११ मोठ्या दुभत्या जनावरांचा समावेश आहे. तसेच ३ लहान आणि १२६ मोठी ओढकाम करणारी जनावरेही दगावली आहेत. विविध घटनांमध्ये आजवर ५० जणांचा मृत्यू झाला असून, ५१ जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना ७, परभणी २, हिंगोली २, बीड ५, लातूर ६, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद केले आहे.

मराठवाड्याचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. असून, त्या तुलनेत १ ते १७ जूनपर्यंत ८७ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी ७८३ मि.मी. पाऊस झाला होता. शेतकरी वर्ग सध्या आर्थिक अडचणीत असून, शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *