नागपूरमध्ये माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘मुंबईला न जाता नागपूरमध्येच चर्चा व्हावी,’ असा ठाम पवित्रा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी घेतला आहे. सरकारने चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असलं तरी कडूंनी ते आवाहन फेटाळून लावत आंदोलन स्थळीच बैठक घेण्याचा आग्रह धरला आहे. मुंबईला गेल्यास पोलीस दडपशाहीच्या भीतीने आंदोलन गुंडाळले जाईल, असा कडूंचा दावा आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी नागपूरमधील जामठा स्टेडियम परिसरात रेल्वे ट्रॅकवर उतरून “रेल्वे रोको” आंदोलन सुरू केले होते. काही वेळासाठी नागपूर-मुंबई आणि नागपूर-चेन्नई मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप करून ट्रॅक मोकळा केला. त्यानंतर बच्चू कडूंनी आंदोलकांना शांततेचं आवाहन करत “कुणीही रेल्वे रोको आंदोलन करू नये,” असं स्पष्ट केलं.
आज सायंकाळी ४ वाजता राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी भेट देऊन बच्चू कडूंसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेला तोडगा निघणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
बच्चू कडूंच्या आठ प्रमुख मागण्या:
1. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
2. कृषी मालाला हमीभावावर 20% अनुदान द्यावे.
3. ग्रामीण घरकुल योजनेत शहराप्रमाणे ५ लाखांचे अनुदान मिळावे.
4. पेरणी ते कापणीचा खर्च मनरेगातून (MREGS) करावा.
5. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा.
6. दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथांना मासिक ₹६,००० मानधन द्यावे.
7. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे.
8. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावेत.
या मागण्यांवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, यावर पुढील आंदोलनाचं भवितव्य ठरणार आहे.


Leave a Reply