सध्या दिवसा लोडशेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र प्राण्यांसह इतर संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट देणार असल्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज येथे संवाद उद्योजकांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार उपस्थित होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवाद सत्रात चर्चा झाली तसेच उद्योजकांच्या विविध मागण्यांवर देखील बोललं गेलं. अजित पवार यांनी या मागण्या गांभीर्याने ऐकून घेत त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचसोबत त्यांनी दिवसा लाईट देण्याची घोषणा केली. अजित पवार म्हणाले, “आता आम्ही तुम्हाला दिवसाच वीज देणार. रात्रीची वीज शेतकऱ्यांना देणार नाही. आत्ता आठवड्यातील निम्मे दिवस दिवसा आणि निम्मे दिवस रात्री वीज दिली जाते. परंतु बिबटे, रानगवे अशा वन्यप्राण्यांचं संकट आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते. म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की, वीज पुरवठा आणि दिवस मावळला की, वीज पुरवठा बंद. जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरीच झोपता येईल.” असं अजित पवारांनी सांगितलं.
राज्यातील शेतकऱ्यांना रात्री शेती पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं. रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव जोखमीत घालून शेतात जावं लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास कृषी पंपासाठीअखंडित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी मागील कित्येक वर्षांपासून करत आहेत.राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वीज पुरवठा रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात हजर राहावं लागतं. राज्यातील विविध जिल्ह्यात बिबटे, रानडुक्कर, रानगवे यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ले करू लागले आहेत, असं शेतकरी सांगतात.
Leave a Reply