राज्यात मान्सूनच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वेळेपूर्वी काही भागांत मुसळधार पाऊस झाला असला, तरी अनेक भागांत अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जूनअखेरपर्यंत केवळ २२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, कापूस, मूग, उडीद आणि ज्वारीच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठवाड्यात जोरदार, विदर्भ मात्र कोरडा
यावर्षी मराठवाड्याला नेहमीप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागली नाही, तर विदर्भातील जिल्ह्यांना मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम मान्सूनवर झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात एकूण १.४० कोटी हेक्टरवर खरीप पेरण्या होतात, त्यापैकी निम्मे क्षेत्र जूनपर्यंत पेरणीखाली येते. मात्र, यावर्षी केवळ २२ लाख हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये मराठवाड्याचे क्षेत्र जास्त असून, विदर्भाचे क्षेत्र तुलनेने कमी आहे.
कापूस लागवडीवर संकट
विदर्भात कापसाचे सर्वाधिक १२ ते १५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. कापूस लागवडीसाठी २० जूनपर्यंतचा कालावधी योग्य मानला जातो. मात्र, विदर्भात पाऊस लांबल्याने कापसाचा पेरा घटण्याचा धोका वाढला आहे. हवामान अभ्यासक सुरेश चोपणे यांच्या मते, यावर्षी विदर्भात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
मूग आणि उडदाचे क्षेत्र घटणार
मूग आणि उडीद लागवडीचा कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यातच संपतो. शेतकऱ्यांना वेळेत पेरणी करता न आल्याने मूग आणि उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.
पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीसाठी भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने उंच लाटांचा इशारा दिला असून, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आहे.गत १० वर्षांचा अभ्यास केल्यास पेरणीचा कालावधी लांबत चालला असून, परतीचा पाऊस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी बियाण्यांमध्ये संशोधन होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मान्सूनच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
Leave a Reply