मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट करत ‘कुणबी प्रमाणपत्र’ देण्यासह इतर मागण्यांबाबत ३० एप्रिल २०२५ ही अंतिम मुदत असून, त्याआधी सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर थेट मुंबईत आंदोलन उभारू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार संदीपान भुमरे यांनी बुधवारी शाहगड (ता. अंबड) येथील छत्रपती भवनात जरांगे पाटील यांची भेट घेतली. दुपारी १२:३० च्या सुमारास झालेल्या या बंद दाराआड चर्चा सुमारे तासभर चालली. चर्चेचा तपशील उघड करण्यात आलेला नसला, तरी पुढील घडामोडींसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
उद्योगमंत्री सामंत यांनी भेटीनंतर माध्यमांना सांगितले की, येत्या २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे.जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. गॅझेट लागू करा. कुणबी नोंदी शोधण्याचा वेग वाढवा. दिलेली मुदत ३० एप्रिलला संपत आहे. त्यानंतर सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यभर बैठक घेऊन मुंबईत मोठे आंदोलन उभारू.कोणताही नेता भेटीस आला तरी समाजाच्या प्रश्नावरच बोलणार. व्यक्तीकेंद्री राजकारण नको, हे आंदोलन समाजासाठी आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


Leave a Reply