मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता पहिल्यांदाच त्यांचं उघडपणे कौतुक केलं आहे. धाराशिवमधील एका कार्यक्रमात जरांगे यांनी फडणवीसांना थेट ‘काकाजी’ म्हणून संबोधलं.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे पोलिस लाठीमार झाला होता. त्यावेळी गृहमंत्रिपद फडणवीसांकडे असल्याने त्यांच्यावर जबाबदारी टाकत जरांगे आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री फडणवीसांवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलनानंतर परिस्थिती बदलली. सरकारने मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य केल्यामुळे जरांगे यांनी आपली भूमिका मवाळ करत फडणवीसांचं कौतुक सुरू केलं.
जरांगे म्हणाले, “फडणवीस काकांनी मराठ्यांसोबत जुळवून घेतलं आहे. त्यांनी हैद्राबाद गॅझेट प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. आमचं भलं केलं तर आम्ही त्यांचं कौतुक करू. आरक्षणाचा प्रश्न सुटला की आम्ही मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल उधळणार आहोत.”
या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. कारण आतापर्यंत सतत विरोधी भूमिका घेणारे जरांगे आता संवाद आणि सहकार्याचा सूर लावताना दिसत आहेत. फडणवीसांसाठी हे निश्चितच प्रतिमाविजय मानलं जात आहे.
मराठा समाजाचं आंदोलन शमवून सरकारने काही प्रमाणात विश्वास जिंकला आहे. आता जरांगे यांचं हे ‘काकाजी’ संबोधन आणि कौतुक ही आगामी घडामोडींना दिशा देणारी ठरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Leave a Reply