माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पक्षप्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत आपला निर्णय वेदनेतून घेतल्याचे स्पष्ट केले. “हा निर्णय प्रामाणिकतेशी तडजोड करणारा नाही. मात्र मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी मला वेगळा निर्णय घ्यावा लागत आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या पोस्टमध्ये वैयक्तिक दुःख, संघर्ष आणि जबाबदाऱ्यांचे वास्तव प्रकर्षाने जाणवते.

तेजस्वी घोसाळकर या २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक १ मधून विजयी झाल्या होत्या. त्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला.

त्या घटनेनंतर दोन लहान मुलांची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय कामकाज सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले. “आज राजकारण आणि समाजकारण करताना मला केवळ पदाची नाही, तर निर्भीडपणे आणि मनापासून साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे,” असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर तेजस्वी घोसाळकर यांची भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. त्याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज त्यांच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, आगामी स्थानिक राजकारणात या प्रवेशाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *