वाडा : कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. जनसेवा मंडळ ट्रस्टच्या साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि नित्यानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मैदान, वाडा येथे शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या सामाजिक उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शिबिरस्थळी रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत होमिओपॅथिक औषधोपचारही देण्यात आले.
ग्रामीण भागात अनेकदा दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत या शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना मोफत आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला. शिबिरात रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुधीर म्हात्रे, नितीन म्हात्रे, महेश म्हात्रे तसेच समस्त म्हात्रे परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध व्यवस्था करून रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही.
कै. दाजी म्हात्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित हा उपक्रम समाजसेवेची परंपरा जपणारा ठरला. उपस्थित नागरिकांनी या स्तुत्य सामाजिक कार्याबद्दल आयोजकांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



Leave a Reply