राज्यात अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचल्यामुळे तीव्र उष्णतेच्या झळांनी फळबागा, भाजीपाला आणि नव्याने लावलेली रोपे करपत आहेत. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्यांवर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमानामुळे पपईची झाडे व फळे करपली असून,जळगाव जिल्ह्यात केळीची पाने करपून झाडांवर काळे डाग पडत आहेत. उन्हामुळे केळीची झाडे अशक्त बनत असून, रात्रीच्या वाऱ्यामुळे ती झाडे कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.
स्ट्रॉबेरीवर उन्हाचा फटका
महाबळेश्वर आणि वाई परिसरातील स्ट्रॉबेरीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, तीव्र उष्णतेमुळे वेली करपून जळून गेल्या असून स्ट्रॉबेरी फळांवर काळे डाग पडून ती खराब होत आहे.स्ट्रॉबेरीचा हंगाम अजून पंधरा दिवस चालला असता. पण, उन्हामुळे आठ दिवसांत आटोपण्याची चिन्हे आहेत.सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगलीच्या पूर्व भागांतील द्राक्ष पिकांना देखील उष्णतेचा फटका बसत आहे. द्राक्षांच्या घडांना सावली देण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. उन्हाळ्यात ज्या कलिंगड, टरबूज, खरबूज, काकडीसारख्या पिकांना मोठी मागणी असते, ती वेलवर्गीय पिके सध्या करपत आहेत.
जुलै-ऑगस्ट महिन्यांत भाजीपाल्यांचे दर वाढतात, हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी गुढी पाडव्याच्या कालावधीनंतर लागवड करतात. पण सध्या वाढत्या तापमानामुळे नवीन लागवड केलेली रोपे करपत आहेत, त्यामुळे जून-जुलैमध्ये भाजीपाल्याच्या दरवाढीचा मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो.
राज्यातील वाढते तापमान फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी अत्यंत प्रतिकूल ठरते आहे. केळी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात होरपळ होत असून, यामुळे दोन महिन्यांत बाजारात भाजीपाला महाग होण्याचा धोका आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना सावलीची व्यवस्था करावी लागत आहे. तापमानात घट न झाल्यास भाजीपाला शेती मोठ्या संकटात सापडू शकते.
Leave a Reply