नक्षलवादाच्या छायेतून शिक्षणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल, ७२ वाचनालये उभारले

गडचिरोली जिल्हा एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखला जात होता. पोलिसांचे अस्तित्वच नसलेल्या या भागात आज शिक्षणाची क्रांती होत आहे. पोलिस प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल ७२ वाचनालये उभारून नवा इतिहास रचला आहे. या वाचनालयांमुळे जिल्ह्यातील तरुणाईला अभ्यासासाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळाले आहे. स्पर्धा परीक्षा, नैतिक मूल्ये व संस्कार यांसंबंधी हजारो पुस्तके येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मते, आतापर्यंत जवळपास २०५ विद्यार्थी पोलिस शिपाई, तलाठी, वनरक्षक अशा विविध सरकारी पदांवर निवडले गेले आहेत. सध्या ६ हजार विद्यार्थी या वाचनालयांचा सक्रियपणे उपयोग करत आहेत, तर एकूण २४ हजार पुस्तके येथे उपलब्ध आहेत.

या मोहिमेत गडचिरोलीतून इतरत्र बदली झालेल्या अधिकार्‍यांचे विशेष योगदान आहे. नारगुंडा येथे सुरू झालेले पहिले “वाचपाय युवा वाचनालय” या चळवळीचा पाया ठरले. स्थानिक नागरिक, सीआरपीएफ, एसआरपीएफ तसेच विविध कंपन्यांच्या सहकार्याने अनेक वाचनालये पुस्तके व सुविधा यांनी समृद्ध झाली आहेत. विद्यार्थ्यांना महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांची जीवनचरित्रेही अभ्यासता येत आहेत. त्यामुळे तरुण पिढीमध्ये राष्ट्रीय विचार, आत्मविश्वास आणि स्पर्धा परीक्षेतील तयारीची नवी ऊर्जा निर्माण होत आहे. १५ जानेवारी २०२३ रोजी दुर्गम कोटगुल येथे पहिले सार्वजनिक वाचनालय सुरू झाले होते. आज, फक्त काही वर्षांत गडचिरोलीत ज्ञानप्रकाशाचा दीप उजळला असून, नक्षलवादाच्या छायेतून जिल्हा शिक्षण व विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *