जीबीएसचा वाढता प्रभाव; पण घाबरू नका परिस्थिती नियंत्रणात!” – जे. पी. नड्डा

पुण्यात गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या वाढत असली तरी हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून, या आजारावरील उपचारांसाठी आवश्यक औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी ऑनलाईन बैठकीत दिली.
या बैठकीस केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आरोग्यमंत्री नड्डा यांनी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. विशेषतः ज्या भागांमध्ये जीबीएस रुग्णसंख्या वाढत आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. तसेच कुक्कुटपालन व्यवसाय असलेल्या परिसरात तपासणी करावी, पाणीपुरवठा आणि शुद्धिकरण विभागाने जलशुद्धीकरण मोहिमेवर भर द्यावा, आणि पाइपलाइन दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले.
सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवलेल्या मानक कार्यपद्धतींचे (SOP) पालन करावे, तसेच रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी फिजिओथेरपी आणि समुपदेशनाच्या सुविधा द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर माहिती देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले की, पुण्यातील जीबीएस रुग्णांबाबत केंद्र सरकारला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका परस्पर समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *