नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झी पिढीत वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात झालेल्या संघाच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. जगभरातील अनेक देशांमध्ये या पिढीच्या सहभागामुळे हिंसाचाराच्या घटना वाढत असून, लोकशाहीच्या स्थैर्याला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भागवत म्हणाले की, अनेक देशांमध्ये सरकार आणि समाजामधील संवाद तुटल्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. आंदोलने, संघर्ष आणि अविश्वास यामुळे तेथील परिस्थिती बिघडली आहे. मात्र भारतात सरकार आणि समाज यांच्यातील संवाद कायम असून, त्यामुळे लोकांचा विश्वास टिकून आहे. लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक विषमता हा आणखी एक गंभीर मुद्दा असल्याचे भागवत यांनी अधोरेखित केले. आज जगभरातील संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीत होत असून, श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. ही दरी केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक असंतोषालाही कारणीभूत ठरते. समाजातील सर्व घटकांना समान संधी देणे आणि ही तफावत कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, भारताच्या सर्वसमावेशक परंपरेवर भर देत भागवत म्हणाले की, हिंदू समाज कोणालाही दूर करत नाही. धर्मांतर झालेल्यांनाही तो सोबत घेतो. भारत म्हणजे सर्व समाज आणि सर्व लोक, ही भूमिका त्यांनी मांडली. भागवतांच्या भाषणातून तरुण पिढीच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याची गरज, आर्थिक विषमता कमी करण्याचे महत्त्व आणि सरकार-समाज यांच्यातील विश्वास दृढ राखण्याचा संदेश स्पष्ट झाला. या तिन्ही मुद्द्यांवर उपाय शोधल्यास भारत जागतिक नेतृत्वाकडे अधिक वेगाने वाटचाल करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply