गोव्यातील बर्च नाईटक्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासाला मोठे वळण मिळाले आहे. आगीच्या पाचव्या दिवशी क्लबचे सहमालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. थायलंड पोलिसांनी हातकड्यांसह आणि त्यांच्या पासपोर्टसह दोघांचे फोटो जाहीर केले आहेत.
आगीची घटना घडत असताना आणि बचावपथके जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना, लुथरा बंधूंनी दिल्लीहून फुकेतला जाण्यासाठी विमान तिकिटे बुक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचे गुन्हे दाखल असून इंटरपोलने त्यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी त्यांच्या पासपोर्टचे निलंबन केले असून त्यामुळे ते थायलंड बाहेर प्रवास करू शकणार नाहीत.
या प्रकरणात दिल्ली पोलिसदेखील तपासात सहभागी झाले आहेत, कारण आरोपी दिल्लीचे रहिवासी असून क्लबशी संबंधित अनेक भागीदारही तेथेच राहतात. गोव्याच्या न्यायालयाने लुथरा बंधूंसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी रोहिणी न्यायालयाला दिली. दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून, ते कामानिमित्त थायलंडला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गोवा पोलिसांनी दिल्लीतील क्लबच्या चार मालकांपैकी एक अजय गुप्ताला अटक केली असून त्याला ३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर गोव्यात आणण्यात आले. तसेच नाईटक्लबच्या मुख्य व्यवस्थापकासह पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर गोवा प्रशासनाने नाईटक्लब, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळी फटाके वापरण्यास बंदी घातली आहे. इलेक्ट्रिक फटाक्यांमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भीषण दुर्घटनेनंतर तपास अधिक गतीने सुरू असून, जबाबदारांवर कारवाईची अपेक्षा वाढली आहे.


Leave a Reply