नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्प परिसरात वाढलेल्या पाणलोटामुळे रविवारी सकाळी तब्बल १७ गेट उघडण्यात आले असून, ३ लाख ९ हजार १७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
गेल्या आठवडाभरापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नांदेड, मुखेड, भोकर, हदगाव, बिलोली, हिमायतनगर, देगलूर, लोहा, माहूर, किनवट, धर्माबाद आणि अर्धापूर या १३ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी विष्णुपुरी धरणातील पाणी साठा ३८९.३३ मीटरपर्यंत पोहोचला आहे, तर साठवण क्षमतेची मर्यादा ३८९.५३ मीटर आहे. पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
या मोठ्या विसर्गामुळे नदीकाठच्या नांदेड शहरासह बोंडगाव, बाळापुर, कोंढी, हडगाव, कृष्णा पुल परिसर, गंगाखेड, लिंबगव्हाण, माळेगाव, खैरे आणि तांबोळी या गावांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदतकार्य सुरू असून, प्रभावित भागात सतत लक्ष ठेवले जात आहे.
गोदावरी नदीवरील जुन्या पुलावरील इशारा पातळी ३४९ मीटर असून ती शनिवारीच ओलांडली गेली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विष्णुपुरी प्रकल्पातून सुरू झालेला वाढीव विसर्ग आणि सततच्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पुढील काही दिवसांतील पर्जन्यमानावर गोदावरीच्या पूरस्थितीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
Leave a Reply