मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन लोकलमध्ये हे दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम यशस्वी झाल्यावर एकूण १३८ एसी लोकलमध्ये अशा प्रकारचे दरवाजे बसवले जातील. त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
१७ डब्यांच्या लोकलऐवजी ११ डब्यांच्या लोकलचा विचार
या बदलांमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अधिक सुरक्षितता मिळेल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेवरील १७ डब्यांच्या लोकलऐवजी ११ डब्यांच्या लोकल वापरण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन १३८ एसी लोकलची खरेदी
सतीश कुमार यांनी सांगितले की, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या १३८ नवीन, १२ डब्यांच्या एसी लोकल खरेदी करण्याचा विचार आहे. यासाठी लवकरच निविदा मागवण्यात येतील. या निर्णयामुळे प्रवाशांना आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.
मध्य आणि पश्चिम रेल्वेची सद्यस्थिती
सध्या मध्य रेल्वेवर ११६ गाड्या असून, त्या सर्व वापरात आहेत. या गाड्यांच्या दररोज १८९० फेऱ्या होतात आणि त्यातून सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वेवर १११ गाड्या आहेत, ज्या सर्व वापरात आहेत. या गाड्यांच्या दररोज ११०९ फेऱ्या होतात आणि त्यातून सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करतात.
Leave a Reply