गुगलची डिजिटल जाहिरात बाजारपेठेतील मक्तेदारी बेकायदेशीर – अमेरिकन न्यायालयाचा निर्णय

ऑनलाईन जाहिरात तंत्रज्ञानाच्या दोन प्रमुख क्षेत्रांवर गुगलने जाणूनबुजून व बेकायदेशीरपणे वर्चस्व गाजवल्याचा ठपका अमेरिकेतील एका फेडरल न्यायालयाने ठेवला आहे. या निर्णयामुळे गुगलच्या जाहिरात व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, अमेरिकेच्या न्याय विभागाला गुगलची काही उत्पादने विभागणीसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथील यूएस जिल्हा न्यायाधीश लिओनी ब्रिंकेमा यांनी गुगलने “प्रकाशक जाहिरात सर्व्हर” आणि “डिजिटल जाहिरात देवाणघेवाण बाजारपेठा” या दोन क्षेत्रांमध्ये जाणीवपूर्वक आणि सातत्याने मक्तेदारी राखल्याचे नमूद करत गुगलला दोषी ठरवले. यासंदर्भात पुढील टप्प्यात न्यायालय गुगलने कोणती सुधारात्मक पावले उचलावीत, यावर स्वतंत्र सुनावणी घेणार आहे. हा निकाल गुगलविरोधातील दुसरा मोठा झटका मानला जातो. याआधीही कंपनीला ऑनलाईन शोध सेवा क्षेत्रातील मक्तेदारीबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. न्यायाधीश ब्रिंकेमा यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल जाहिरात क्षेत्र हे इंटरनेटच्या आर्थिक संरचनेचे मूलभूत अंग आहे आणि गुगलच्या वर्तनामुळे केवळ स्पर्धकांनाच नव्हे, तर प्रकाशक, ग्राहक आणि मुक्त माहितीच्या प्रवाहालाही मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात न्याय विभागाने सुचवले होते की, गुगलने त्याचा ‘गुगल अ‍ॅड मॅनेजर’ व्यवसाय विकावा, ज्यात प्रकाशक जाहिरात सर्व्हर आणि जाहिरात देवाणघेवाण प्रणालीचा समावेश आहे. यापूर्वी युरोपियन अँटीट्रस्ट संस्थांशी सहकार्य करताना गुगलनेही त्याच्या अ‍ॅड एक्सचेंज विकण्याचा विचार केला होता.

तथापि, न्यायालयाने गुगलचे जाहिरात नेटवर्कमधील मक्तेदारीचे आरोप फेटाळले. गुगलने आपल्या बचावामध्ये सांगितले की, प्रकाशकांकडे अनेक पर्याय असून ते गुगलची निवड करतात कारण गुगलची साधने सुलभ, प्रभावी आणि किफायतशीर आहेत. कंपनीने या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयाचे स्वागत करत अमेरिकेच्या अटर्नी जनरल पामेला बोंडी यांनी याला “डिजिटल पब्लिक स्क्वेअरमधील मक्तेदारीविरुद्धचा एक निर्णायक विजय” असे संबोधले. डेमोक्रॅट सिनेटर एमी क्लोबुचर यांनी हा निकाल “ग्राहक, लघुउद्योजक व कंटेंट निर्मात्यांसाठी एक मोठा दिलासा” असल्याचे सांगितले.

रनिंग पॉइंट कॅपिटलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मायकेल अ‍ॅशले शुलमन यांनी या निकालाला “महत्त्वाचा वळणबिंदू” म्हणून संबोधले. त्यांच्या मते, या निर्णयामुळे अमेरिकेतील न्यायालये आता “आक्रमक व संरचनात्मक उपाययोजनांकडे” वळण्यास तयार आहेत. परिणामी, Amazon व Meta यांसारख्या इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांवरही नियामक दबाव वाढण्याची शक्यता आहे.

गुगलप्रमाणेच Meta, Amazon आणि Apple या कंपन्यांविरुद्धही अँटीट्रस्ट संबंधी कारवाया सुरू आहेत. Meta वर वैयक्तिक सोशल नेटवर्क्समधील मक्तेदारी, Amazon वर ई-कॉमर्स क्षेत्रातील वर्चस्व, तर Apple वर स्मार्टफोन बाजारपेठेतील एकाधिकाराचा आरोप आहे.

गुगलने न्यायालयात युक्तिवाद करताना स्पष्ट केले की, या खटल्याचा केंद्रबिंदू भूतकाळातील घटना आहेत. सध्या कंपनी तिची साधने स्पर्धकांच्या प्रणालींशी सुसंगत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र न्यायाधीश ब्रिंकेमा यांनी काही अधिग्रहणांबाबत गुगलच्या बाजूला थोडीशी दिलासादायक भूमिका घेतली असली तरी त्यांनी स्पष्ट केले की, गुगलने आपल्या अ‍ॅड सर्व्हरचा वापर करून जाहिरात देवाणघेवाण प्रणालीशी बेकायदेशीरपणे संबंध जोडला आणि त्यामुळे स्पर्धेला बाधा पोहोचवली, जे प्रकाशकांच्या हिताच्या विरोधात ठरले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *