राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकवणे, शांतता प्रस्थापित करणे आणि सामाजिक सौहार्द जपणे ही राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. मात्र, महायुती सरकार धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हेतुपुरस्सर धर्मांधतेचे विष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाच्या संबंधित संघटना औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन करत असताना मंत्री आणि मुख्यमंत्रीही त्यास पाठिंबा देत आहेत. परिणामी, राज्यात अशांतता वाढत असून सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात संपूर्णतः अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे संविधानविरोधी वर्तन पाहता राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. नागपूर हिंसाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीबाबत त्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमिन पटेल, भाई जगताप, विकास ठाकरे, राजेश राठोड, संजय मेश्राम, बाळासाहेब मांगुळकर, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
”मुख्यमंत्री व मंत्री संविधानाच्या विरोधात”-हर्षवर्धन सपकाळ
शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मत्स्यपालन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी धार्मिक तेढ वाढवण्यासाठी सातत्याने भडक विधाने केली. त्यांना मुख्यमंत्री पाठिशी घालत असल्याने हे स्पष्ट होते की राज्य सरकार सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडवण्याचे काम करत आहे. औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारचीही त्या वास्तूच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. पण, भाजपाच्या मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या संघटना कबरीविरोधात आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे संविधानाचे पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची अपेक्षा असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.
नागपूर शहरात रामनवमी आणि ताजुद्दीन बाबाच्या उरुसामध्ये दोन्ही धर्मांचे नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. नागपूरने आजवर सामाजिक सौहार्द जपला आहे. मात्र, या शहरात धार्मिक कारणावरून हिंसाचार होणे चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने नागपूर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दंगलग्रस्त भागात जाण्यास परवानगी नाकारली. समितीने सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून दंगलीबाबत माहिती घेतली व ती राज्यपालांना सादर केली, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले
Leave a Reply