शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या ठिय्या आंदोलनाबाबत सरकार चर्चेस तयार असूनही कडू बैठकीला उपस्थित राहत नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले, “आंदोलन सुरू झाल्यानंतर 26 तारखेला मी स्वतः बच्चू कडूंशी बोललो. 27 आणि 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. मात्र, बच्चू कडू यांच्या बाजूने कोणीही प्रतिनिधी आले नाही.” सरकारकडून सतत संवादाचे प्रयत्न होत असून, आज सकाळीही त्यांनी बच्चू कडूंना अनेक वेळा फोन केले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
कडूंची मुख्य मागणी म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. बावनकुळे यांनी म्हटले की, “या मागण्यांवर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. पण चर्चा न करता सरकारवर आरोप करणे योग्य नाही. जर शेतकरीहिताचा निर्णय घ्यायचा असेल, तर बच्चू कडूंनी चर्चेला हजर राहिले पाहिजे.”
पूर्वी अमरावतीतील आंदोलनावेळीही स्वतः पुढाकार घेऊन काही मुद्द्यांवर तोडगा काढल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. “कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल तयार केला आहे. पात्र शेतकरी, कर्जाचे स्वरूप आणि गैरवापर टाळण्यासाठी सर्वेक्षण आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
कडू यांनी मंत्रालयाऐवजी आंदोलनस्थळीच बैठक घेण्याची मागणी केली असली, तरी बावनकुळे यांनी ती अव्यवहार्य ठरवली. “उच्चस्तरीय बैठकीसाठी अनेक अधिकारी लागतात, त्यांना आंदोलनस्थळी नेणे शक्य नाही,” असे स्पष्ट करत बावनकुळे यांनी बच्चू कडूंना चर्चेला सहभागी होण्याचे आवाहन केले.


Leave a Reply